Hingoli farmer Protest : हिंगोली जिल्ह्यात पीक विमा आंदोलनाला आक्रमक वळण, गोरेगाव-जिंतूर महामार्गावर निषेधार्थ पेटवले टायर

पीक विम्याच्या मुद्द्यावरुन हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पिक विमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील गोरेगाव इथे उपोषण सुरु आहे. आज चौथा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप या उपोषणाची दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज (21 जानेवारी) सकाळी गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ केली. टायर पेटवून देत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
उद्या हिंगोली बंदची हाक
दरम्यान, ज्या कृषीमंत्र्यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलं आहे, त्याच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी उपोषणाला बसावं लागत आहे. पीक विमा आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. उद्या (22 जानेवारी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हिंगोली बंदची हाक देण्यात आली आहे. पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून पीक विम्याचा परतावा मिळावा यासाठी आंदोलन सुरु आहे. अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वाभिमानीच्या वतीनं आज आक्रमक पवित्रा घेत गोरेगाव-जिंतूर महामार्गावर जाळपोळ करण्यात आली.
पिकांना पावसाचा मोठा फटका
यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक या पावसामुळे वाया गेली आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. तसेच पीक विम्याचा परतावा देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार आवाज उठवला आहे. आंदोलने निवेदन दिली आहेत. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा मिळालेला नाही.
अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित
हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीनं पीक विम्यापासून वंचित ठेवलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा करोडो रुपये शेतकऱ्यांचे थकवले होते. प्रीमियम पेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आवाज उठवला होता. हिंगोलीत त्यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा देखील काढला होता. यावेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांसमोर सरकार झुकत असल्याचा आरोप केला होता. सरकारचा पाठबळ पीक विमा कंपन्यांना आहे, सरकार त्यांना पाठिशी घालण्याचं काम करत असल्याचे तुपकर म्हणाले होते. सरकार आणि पीक विमा कंपन्यांचे साट-लोट आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जोपर्यंत पीक विम्याची पूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा तुपकरांना दिला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.