MCOCA : अपघात दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.पोलीस आयुक्त यांची ७ वी कारवाई.

रस्त्यात अपघात झाल्याचा बहाणा करुन लुटणाऱ्या इरफान इस्माईल सैय्यद याच्यासह तीन साथिदारांवर मोक्का अंतर्गत (MCOCA Action) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची आजपर्यंतची ही सातवी कारवाई आहे.
10 डिसेंबर 2022 रोजी फिर्यादी हे रात्री कामावरुन घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या दोन दुचाकी गाडीवरील तीन अनोळखी व्यक्तींनी व त्यांच्या एका महिला साथीदार यांनी फिर्यादी यांना आडवले. तुझ्याकडून मागे दोन अपघात झाले आहेत. त्या अपघाताचा जो काय 40 हजार रुपये खर्च असेल तो द्यायचा नाहीतर तुझा हात उपसुन काढुन आयुष्य उध्वस्त करु, तू प्रॉपर पुण्याचा दिसत नाही अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना जबरदस्तीने मित्राकडून फोन-पे वरुन पैसे घेण्यास लावले. ते पैसे बँकेच्या एटीएममधून जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी 20 हजार रुपये रोख व फोन पे वर 20 हजार असे एकूण 40 हजार रुपये घेऊन बेदम मारहाण केली. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात आयपीसी 394, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना इरफान सैय्यद आणि त्याच्या साथिदारांनी पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे केले असून विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी जबरी चोरी, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात काहीही सुधारणा झाली नाही. आरोपींनी पुन्हा अशा स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -3 सुहेल शर्मा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता. अपर पोलीस आयुक्तांनी कागदपत्रांची पडताळणी करुन आरोपींवर मोक्का कारवाईचे आदेश दिले. पुढील तपास सिंहगड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.