Pune cyber crime : गुगलवरुण कस्टमर केअरचा नंबर घेत असाल तर सावधान! पुण्यात गॅस वितरकाचा नंबर पडला सहा लाखांना

गॅस वितरक म्हणून गूगलवर आलेल्या नंबरवर फोन करुन सल्ला घेतलेल्या माहिलेला सायबर चोरट्यांनी 5 लाख 73 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडरला रेग्युलेटर अनेकदा बसत नाही. तेव्हा गॅस सिलेंडर वितरकाला फोन करतो, त्यांचा माणूस येऊन बसवून देतो. पण एका ज्येष्ठ नागरिक महिलेने एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर गूगलला सर्च केला. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार प्रोसेस केली. त्याचवेळी सायबर चोरट्यांनी त्यांना गंडा घालता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी भांडारकर रोडवर राहणार्या एका 64 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 4 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडला. फिर्यादी यांच्या घरातील गॅस सकाळी संपला. नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुगलवर एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर संपर्क केला. त्याला रेग्युलेटरबाबत सांगितल्याने त्याने मोबाईलवर क्वीक हेल्प अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यामध्ये त्यांना सर्व माहिती भरायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी बँकेसह सर्व माहिती भरली. त्यानंतर त्यांना त्या चोरट्याने 25 रुपये पाठविण्यास सांगितले. ते पैसे पाठविल्यावर तंत्रज्ञ येऊन तुम्हाला काम करुन देईन, काही पैसे असेल तर ते सांगेल, असे सायबर चोरट्याने सांगितले.
तुम्हाला एच पीची 25 रुपयांची पावती मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी एकीकडे फोनवर बोलत असतानाच 25 रुपये ट्रान्सफर केले. त्या त्यांच्या मोबाईलवर सलग मेसेज येण्यास सुरुवात झाली. त्यावेळी त्यांना फसवणूक होत असल्याचं समजलं. त्यांनी तातडीने बँकेला फोन करुन बँक खाते गोठविण्यास सांगितलं. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 5 लाख 73 हजार 807रुपये काढून घेत संपूर्ण खाते रिकामे केले होते.
यापूर्वी पुण्यातील 71 वर्षीय वृद्धाची तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. लाईफ इन्शुरन्सच्या नावाखाली सायबर चोरांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. फसवणूक करुन 35 लाख दिल्ली, नोएडामधील विविध 12 बँक अकाऊंटमध्ये त्यांचे पैसे जमा झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाला दीड वर्षांपूर्वी "लाईफ इन्शुरन्स" घ्या आणि त्यावर चांगला परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. यासाठी फक्त प्री इंस्टॉलमेंट फी भरावी लागेल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करायला सांगितले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.