Koyta gang arrested : कोयता गँगचा खेळ खल्लास? पोलिसांकडून ५ गुन्हेगारांना अटक

गाडी हळू चालवा असे सांगितल्याने सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करत महिलेला मारहाण करून फरार झालेल्या कोयता गँगचे पाच सराईतांना हवेली पोलिसांनी अटक केली आहे. सहा आरोपी अद्याप फरार असून सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचे काम सुरू असून त्यानुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सुरज ठाकूर, निलेश साह, अक्षय चव्हाण, सागर पाटील, निकुन मोरे सर्व राहणार गोऱ्हे बुद्रुक ता. हवेली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काल सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे अरुंद अंतर्गत रस्त्यावर लहान मुले खेळत असल्याने एकाने आरोपींना गाडी हळू चालवा असे सांगितले.
त्यावरुन बाचाबाची झाली व आरोपींनी हातात तलवार व कोयते घेऊन येत भर रस्त्यावर दहशत निर्माण करत महिलांनाही मारहाण केली. तसेच रहिवाशांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले होते. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलिसांच्या पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली होती. अकरा पैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व टोळीवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी (Police) सुरू केली आहे.
कोयता गँगविरोधात गृहविभागाने तातडीने पाऊले उचलावीत - रुपाली चाकणकर
दरम्यान, या घटनेवर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय की पुण्यामध्ये कोयता गँगच्या हल्ल्याने पुणेकर दहशतीच्या सावटाखाली राहत आहेत. एक सांस्कृतिक आणि शांतताप्रिय असलेल्या शहराला ही बाब निश्तितच भूषणावह नाहीये. काही तरुण मुलं ज्यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असतो हातामध्ये कोयता घेऊन दिवसाढवळ्या राजरोसपणे दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही बाब विधिमंडळात देखील चर्चिली गेली होती. तरीही हे प्रकार अजून थांबले नाहीयेत.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पुणे (Pune) शहरालगत असलेल्या गोर्हे बु. गावामध्ये या कोयता गँगने गावातील महिलांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाला प्राप्त झाली आहे.
या कोयता गँगचा नंगानाच असाच चालू राहिला तर गावातील नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या जीविताला धोका निर्माण होऊन कोणताही अनर्थ घडू नये यासाठी यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुणे ग्रामीण पोलिसांना दिले आहेत. तसेच पुण्याची गरिमा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी गृहविभागाने देखील तातडीने धोरणात्मक पाऊले उचलावी यासाठी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.