Jewelers shop : ज्वेलर्सच्या दुकानातून 17 लाखांचे दागिन्यांची चोरी

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथे एका ज्वेलर्स दुकानातून एका कर्मचाऱ्याने 17.03 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात कैलास यादव वारे (47) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याअंतर्गत आरोपी मंजुनाथ बिराजदार (सध्या रा. पिंपळे गुरव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी सांगवी येथील सोनिग्रा गोल्ड एलएलपी (एसजेपीएल सोनिग्रा ज्वेलर्स) या दागिन्यांच्या दुकानात १३ सप्टेंबर रोजी चोरीची ही घटना घडली. फिर्यादी हे या दागिन्यांच्या दुकानाचे व्यवस्थापक असून, आरोपी त्याच्याकडे सेल्समन म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी त्यांनी दुकानातून 17 लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. ही चोरी निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने सांगवी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
तर दुसरीकडे स्वस्तात गाडी मिळवून देतो, असे सांगून एका तरुणाची साडेतीन लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. या संदर्भात संदीप अंगद गंगणे (वय 33) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल जैन (30) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँकेकडून जप्त केलेली कार कमी किमतीत लिलावात मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने फिर्यादीला दिले होते. फिर्यादीचा विश्वास जिंकून त्यांच्याकडून वेळोवेळी तीन लाख 50 हजार 500 रुपये घेतले. पैसे घेऊन कार न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.