Morbi bridge collapse : मोरबीमध्ये पूल कोसळल्याने लोक नदीत पडले, 60 जणांचा मृत्यू

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीत केबल पूल तुटल्याची बातमी आहे. पूल तुटला ( Morbi bridge collapse ) त्यावेळी जवळपास 400 लोक पुलावर होते असे सांगण्यात आले आहे. गुजरातचे पंचायत मंत्री ब्रजेश मेर्झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात किमान 60 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, डझनभर जखमी आहेत. पीएम मोदींनीही या घटनेबाबत अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी या संदर्भात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोलून घटनेवर लक्ष ठेवण्यास सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्यात आली आहे. आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
दुरूस्तीनंतर नुकताच पाच दिवसांपूर्वी पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात आलेला पूल रविवारच्या सुट्टीमुळे गजबजलेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पूल तुटला ( Morbi bridge collapse ) . मोरबी सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. प्रदीप दुधर्जिया म्हणाले, "आतापर्यंत अनेक मृतदेह आमच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत."
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नदीतून लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर करण्यात येत आहे. “आम्ही बोटीच्या मदतीने बचाव कार्य करत आहोत. नदीत सुमारे 40-50 लोक आहेत.” एका खासगी ऑपरेटरने सुमारे सहा महिने पुलाच्या दुरुस्तीचे काम केले होते. 26 ऑक्टोबर रोजी गुजराती नववर्षाच्या दिवशी हा पूल पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.