Scam : शेअर मार्केट मध्ये नफ्याचे आमिष दाखवून कोटींचा गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा, विदेशवारी आणि महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष दाखवून मुख्याध्यापकासह सात जणांना सव्वा कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात नांदेडच्या वजिराबाद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसात दाखल करण्यात गुन्ह्यानुसार, नांदेड शहरातील जुना कौठा भागातील श्रीपादनगरचे मुख्याध्यापक आनंद नागनाथराव रेणगुंटवार हे पंढरपूर येथे एका लग्न सोहळ्यासाठी गेले होते. दरम्यान तेथे त्यांची कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलएलबी कंपनीचे मुख्य संचालक रोहितसिंह धर्मासिंह सुभेदार (रा. दत्तनगर), सांगली यांच्याशी भेट झाली. पुढे या भेटीचे रूपांतर चांगल्या मैत्रीत झाले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा, विदेशवारी आणि महागड्या गाड्या भेट देण्याचे आमिष दाखवून रोहितसिंह धर्मासिंह सुभेदार आणि त्याच्या साथीदाराने रेणगुंटवार यांच्यासह आणखी सहा जणांना गुंतवणूक करण्याचे सांगत त्यांच्याकडून 1 कोटी 14 लाख रुपये घेतले.
यातील आरोपींनी लोकांना फसविण्यासाठी कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड एलएलबी नावाची कंपनी उघडली होती. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी या कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार ठेवण्यात आले. गुंतवणुकीच्या मोबदल्यात आमिषे दाखविली गेली. विदेशवारी, महागड्या गाड्या भेट देण्याचे आश्वासन दिले गेले. यासोबतच करारपत्र करून गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित असल्याचा भास निर्माण केला. तसेच सुरुवातीचे काही महिने आकर्षक परतावाही दिला. परंतु त्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने आरोपींचा भांडाफोड झाला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.