Shinde-Thackeray clash : शिंदे-ठाकरे गट भिडले, कार्यकर्त्याचा गोळीबार ?

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील समर्थकांत आज स्थानिक राजकारणावरून चांगलीच जुंपली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने बाचाबाची झाली. त्यात शिंदे गटाच्या समर्थकाच्या मुलाने गोळीबार केल्याचे बोलले जाते. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.
यासंदर्भात उपनगर पोलिस ठाण्यात तीन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करण्यात येऊन गुन्हेगारांचा बचाव तर निरपराध कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला.
शिवजयंती उत्सव समिती निवडीसाठी झालेल्या बैठकी दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे व शिवसेनेच्या शिंदे गटात बाचाबाची झाली. या घटनेत एकाने हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरातील दुकाने पटापट बंद झाली.
पोलिसांनी जादा कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणली. देवळाली गावातील गणेश मंदिर सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. दरम्यान,रात्री देवळालीगावात दंगाविरोधी पथक दाखल झाले असून स्थिती नियंत्रणात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.