Incometax raid : सोलापूर बड्या उद्योगपतींच्या घर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली. या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
50 कोटी रुपयांचे व्यवहार बोगस
सोलापुरातील आसरा चौक कुमठा नाका हैदराबाद रोड परिसरामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये आयकर विभागाने हे छापे टाकलेत आहेत.
भंगार विक्रेत्यांचा रोखीने व्यवहार
यामध्ये विशेषता भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आलेय.
याआधी सोलापुरात छापेमारी
मुळगाव रोड येथील एका कत्तलखाना चालवणाऱ्या कंपनीवर ही छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यातून धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याची माहिती आहे. दरम्यान, याआधी ऑगस्ट 2022 मध्येही सोलापूर शहरात देखील आयकर विभागाने धाडसत्र टाकले होते. व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्यावतीने चौकशी सुरु होती. सोलापुरातील व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी झडती घेतली होती. सोबतच अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाने झाडाझडती घेतली होती.
तसेच जालन्यामध्ये आयकर विभागाने शेकडो कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरात एकाच वेळी 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. सर्वाधिक छापेमारी ही कारखानदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर पडली होती.
आतापर्यंत या ठिकाणी छापेमारी
- मेहुल कन्स्ट्रक्शन (सोलापूर)
- अश्विनी हॉस्पिटल (सोलापूर)
- अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी (सोलापूर)
- व्यावसायिक बिपीन पटेलांच्या घरी (सोलापूर)
- स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल (सोलापूर)
- डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक (सोलापूर)
- रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल (सोलापूर)
- पंढरपूर येथे एका साखर कारखान्यावर छापा
- नांदेड येथे एका ठिकाणी छापा
- बीड येथे एका ठिकाणी छापा
- उस्मानाबाद येथे दोन ठिकाणी छापेमारी
- कोल्हापूर येथे एका ठिकाणी
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.