Scheme for Gatai worker : गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना,31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जाती घटकात चर्मकार समाजातील गटई काम करणाऱ्या कामगारांसाठी पत्र्यांचे स्टॉल देण्याची योजना राबवण्यात येत असून त्यासाठी 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चर्मकार समाजातील गटई काम (चामड्याच्या वस्तू दुरुस्ती व पादत्राणे दुरुस्ती) करणाऱ्या व्यक्तीस रस्त्याच्या कडेला ऊन व पावसापासून संरक्षण होण्यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 फूट लांबीx 5 फूट रुंदीx 6.5 फूट उंची या आकाराचा पत्र्याचा स्टॉल शासनाकडून देण्यात येतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा व त्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र जोडावे. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षादरम्यान असावे व वार्षिक उत्पन्न नागरी भागासाठी 50 हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी 40 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. उत्पनाचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे. स्टॉल ठेवण्यासाठी स्वत:ची जागा असावी किंवा नगर परिषद, महानगरपालिका जागेमध्ये ठेवण्यासाठी ना- हरकत प्रमाणपत्र असावे. तसेच स्टॉल विकणार नसल्याचे हमीपत्रही अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
इच्छुकांनी मुदतीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. 104/105. विश्रावाडी पोलिस स्टेशनच्या समोर येरवडा, पुणे 411006 (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त संगिता एन. डावखर यांनी केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.