Strict Action against unauthorized school : अनधिकृत शाळांवर होणार कडक कारवाई- शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

राज्य सरकारची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अनधिकृतपणे सुरू झालेल्या इंग्रजी शाळांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाने मोहीम आखली आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या तेरा शाळांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी गटशिक्षणाधिकार्यांना दिला आहे. या शाळांवर थेट गुन्हेच दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
यामध्ये पुंरदर, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सीबीएसई शाळा सुरू केल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना त्या पाठोपाठ आता जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळांबाबत शिक्षण विभागाने कडक पाऊल उचलले आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा शोधण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकार्यांना शाळा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
अनधिकृतपणे सुरू असलेल्या तेरा शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश गटशिक्षणाधिकार्यांना प्रशासनाने दिला आहे. सर्व गटशिक्षणाधिकार्यांना अनधिकृत शाळांची तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. असे संध्या गायकवाड (शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद) म्हणाल्या.
यामध्ये अशा 43 शाळा आढळून आल्या. जिल्हा परिषदेच्या कारवाईनंतर काही शाळा बंद केल्या, तर काही अद्यापही सुरूच असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे राज्य सरकारची मान्यता नसतानाही त्या शाळा अद्याप सुरू ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. गटशिक्षणाधिकार्यांनी शाळा तपासणीच्या दिलेल्या अहवालाच्या आधारे पुणे जिल्ह्यात 13 शाळा अनधिकृतपणे कार्यरत आहेत. त्या शाळांना राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही.
अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांमध्ये हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या ठिकाणच्या शाळांचा समावेश आहे. त्याशिवाय दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.