Marathi actress sulochana : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुलोचना यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी दादर येथील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुलोचना दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती.
चित्रपटातली आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या.
1943 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजकपूर शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीबरोबरही त्यांनी काम केलं.
‘वहिनीच्या बांगड्या,’ ‘मीठ भाकर’ ‘मराठा तितुका मेळावा’ साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले गाजलेले चित्रपट आहेत.
सुलोचना दीदी म्हणून त्या सगळीकडे ओळखल्या जात. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 ला झाला.
चित्रपटात आल्या तेव्हा त्यांची भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. म्हणून भालजी पेंढारकरांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं.
ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं. मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि त्या भाषा दिव्यातून गेल्या.
सुलोचना दीदी यांचा अल्प परिचय
- 30 जुलै 1929 रोजी सुलोचना दीदी म्हणजेच सुलोचना लाटकर यांचा जन्म झाला.
- सुमारे 400 सिनेमांत सुलोचना दीदींनी भूमिका केल्या.
- कोल्हापूर येथील खडकलाट गावच्या सुलोचना दीदी
- चिमुकला संसार या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली
- वहिनीच्या बांगड्या या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली
- प्रपंच, मराठा तितुका मेळवावा, एकटी, मोलकरीण, सासूरवास हे गाजलेले मराठी सिनेमा
- सुजाता, जॉनी मेरा नाम, कोरा कागज, कटी पतंग, बहारो के सपने, रेश्मा और शेरा हे गाजलेले हिंदी सिनेमा
- बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'मजबूर' या सिनेमात भूमिका केली होती
- पद्मश्री, महाराष्ट्र भूषण फिल्मपेअर जीवनगौरव या पुरस्कारांनी सुलोचना दीदी यांना सन्मानित करण्यात आले होते
- भालजी पेंढारकर हे सुलोचना दीदी यांचे गुरू
2009 मध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित
मराठी-हिंदी सिनेमांतून सोज्वळ भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्री सुलोचना यांचा चेहरा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. पासष्टहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञांच्या अनेक पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधानाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनीही ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.