Emergency Landing : ओमानला जाणाऱ्या विमानाचं अचानक करावं लागलं लँडिंग

केरळच्या त्रिवेंद्रम इथून मस्कतला (ओमानची राजधानी) निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं आहे. या विमानातून १०५ प्रवाशी प्रवास करत होते. उड्डाणानंतर केवळ तासाभरातच हे विमान पुन्हा खाली उतरवण्यात आलं.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमानानं सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्रिवेंद्रम विमानतळावरुन मस्कतसाठी उड्डाण केलं होतं. पण उड्डाणानंतर पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय या पायलटनं घेतला. त्यानंतर ९.१७ वाजता हे विमान पुन्हा त्रिवेंद्रम विमानतळावर उतरवण्यात आलं.
विमान कंपनीच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात FMS अर्थात फ्लाईट मॅनेजमेंट सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळं विमान पुन्हा लँड करण्याचा निर्णय पायलटनं घेतला. सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.