Police Commemoration Day : 21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन 2022

दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन देशभर पाळला जातो. या दिवशी संपुर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलाला अभिमानाचा,शौर्याला मानवंदना देण्याचा,त्याचबरोबर आपल्या जुन्या सहका-यांच्या स्मृतीने मन हेलावणाराही असतो.
21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणुन पाळला जाण्यास 1959 मध्ये लडाख भागातील सरहद्दीवर झालेली घटना कारणीभुत ठरली. भारत चीन सरहद्दीवर लडाख भागात 18 हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी हॉट स्प्रिंग्ज येथे गस्त चालु होती. गस्ती तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी कुच करत हॉट स्प्रिंग्जच्या पुर्वेला 06 मैल दुर ती आली असताना पर्वताच्या डाव्या बाजुला तुकडीच्या नेत्याला काही काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या खुणांच्या अनुरोधाने पुढे चालु लागली आणि अचानक भयानक गोळीबार सुरू झाला. त्याठिकाणी पोलीस वीरांनी शौर्याने तोंड दिले. ही विशेष लढाई लढता-लढता यापैकी 10 गस्ती शिपायांना वीरमरण आले व 9 जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले. हे 10 अमर शिपाई होते पुरणसिंग, धरमसिंग, इंगजित सुबा, नोरबु लामा, शिवनाथ प्रसाद, त्शेरिंग नोरबु, इमामसिंग, सवनसिंग, बेगराज आणि माखनलाल असे होते.
त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता. या लढाईत कामी आलेल्या या शुर पोलीस जवानांपैकी पश्चिम बंगालचे-3, हरियाणा-2, पंजाब-2, उत्तर प्रदेश-2, हिमाचल प्रदेश-1 असे होते. ही बातमी वा-यासारखी सा-या देशभर पसरली. 13 नोव्हेंबरला चिनी सैनिकांनी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. 14 नोव्हेंबरला सकाळी 08/00 वा. हॉट Ïस्प्रग्ज येथे त्यांच्या वर सन्मानपुर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलांनी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रध्दांजली अर्पण केली.
त्यानंतर पाटणा येथे 1959 साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धांच्या वेळी सर्वांनी अशी शपथ घेतली. "आमच्या हया वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी 21 ऑक्टॉबरला पोलीस हुतात्मा दिन पाळुन करू' आणि तेव्हापासुन दरवर्षी हा दिन भारत वर्षात मोठया सन्मानाने "पोलीस हुतात्मा दिन' म्हणुन पाळण्यात येतो. राज्या-राज्यातुन पोलीस दले या हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजीत करून त्यांना मानवंदना देतात.
दि.1 सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार अशा एकुण 261 जवान यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले.
मा.डॉ.तानाजी सावंत,(सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई) हे वरील हुतात्म्यांना दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08/00 वा.पोलीस संशोधन केंद्र,पाषाण रोड,पुणे येथे श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. सदर कार्यक्रमास मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी हे हजर राहणार आहेत.
तरी नागरीक व प्रसार माध्यमांना आवाहन करण्यात येते की,पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित राहावे.
सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी होणेस विंनती आहे.
जनसंपर्क अधिकारी,
पोलीस आयुक्त,कार्यालय,पुणे शहर
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.