Sharad Pawar Surgery : शरद पवार यांचे उद्या होणार डोळ्याचे मोतीबिंदू ऑपरेशन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी शरद पवार यांना सोमवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्यावर उद्या सकाळी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये शरद पवार यांच्या डाव्या डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या उजव्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी शरद पवार यांना आठ दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांना उद्या तातडीने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यानंतर शरद पवार पुढील आठ दिवस मुंबईतील त्यांच्या घरी राहणार आहेत. शरद पवार 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर पडणार नाहीत. मात्र यादरम्यान शरद पवार घरच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे.
मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबर महिन्यात शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तब्येत बरी नसताना सुद्धा शरद पवार शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर होते. त्यानंतर ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले होते. याआधीही मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना पित्ताशयाचा त्रास झाला होता. शरद पवार यांना Gallstone म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.