G20 : G20 परिषद आयोजनप्रसंगी देशाची प्रतिमा उंचावण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे: लेफ्टनंट कर्नल उदयसींग बारंगुले

पुणे येथे पुढील वर्षी जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या G20 राष्ट्रांच्या परिषदेच्या आयोजनप्रसंगी देशाची प्रतिमा उंचावण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि याप्रसंगी येणाऱ्या शिष्टमंडळाच्या भेटीप्रसंगी सुरक्षिततेला तसेच शहराचे सौदर्यीकरण आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश पुणे येथे आयोजित जी२० परिषदेचे भारत सरकारचे विशेष कार्य अधिकारी लेफ्टनंट कर्नल उदयसीग बारंगुले यांनी आज दिले.

पुणे येथे होणाऱ्या G20 राष्ट्रांच्या परिषदेबाबत पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी श्री.बारंगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपस्थित विविध विभागांच्या खातेप्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,केंद्रीय वित्त मंत्रालयातील आर्थिक शाखेचे संचालक अमन गर्ग, संचालक रविंदरसिंग, अवर सचिव श्रीशंकर, सहायक संचालक वैभव मोरे, पोलीस उपायुक्त आर.राजा, सामान्य प्रशासन उपायुक्त वर्षा लड्डा उंटवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, राजशिष्टाचार उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, मुख्य वाहतूक व्यवस्थापक विजय राजमाने, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक सुनिता आसवले, हॉटेल जेडब्ल्यू मॅरीएटच्या सरव्यवस्थापिका लीना नेहेटे आदि उपस्थित होते.

G20 राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजन भारतामध्ये होत असून महाराष्ट्रात मुंबईसह पुणे व औरंगाबाद येथे या परिषदेतील सत्रांचे आयोजन करण्यात आले असल्याचे असल्याचे सांगून, श्री.बारंगुले यांनी यासंदर्भात नियोजनामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये असे सांगितले. पुणे येथे जी२० परिषदेच्या चार बैठकांचे आयोजन करण्यात आले असून १६ ते १७ जानेवारी,२०२३ दरम्यान इन्फ्रास्ट्रक्चर वर्कींग ग्रुप बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या आयोजनाच्या तयारीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. यासाठी सर्व संबधित विभागांनी ताळमेळ ठेवून कार्य करावे. महाराष्ट्रासह पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्थळे, येथील खाद्यसंस्कृती, स्वच्छ पुणे, वैविध्य जगासमोर आणण्याची संधी मिळाली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे अशी सूचना केली. १२ ते १४ जून,२०२३ दरम्यान डीजीटल इकोनॉमी वर्कींग ग्रुप मिटींग, २६ व २७ जून,२०२३ रोजी एज्युकेशन वर्कींग ग्रुप मिटींग आणि २८ जून,२०२३ रोजी एज्युकेशन वर्कींग ग्रुप मिनिस्टेरियल मिटींगचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अशाप्रकारच्या आंतरराष्ट्रीयदृष्टया महत्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रशासनाला मोठा अनुभव असून, G20 परिषदेदरम्यान आयोजित सत्रांच्या आयोजनासाठी आवश्यक तयारी सुरु असल्याचे सांगितले. परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना विमानतळ ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पुण्याची वैशिष्ट्ये ठळक दिसतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असून, ऐतिहासिक व महत्वाची वारसा ठिकाणे, शैक्षणिक ठिकाणे, उद्योग आदी ठिकाणी परिषदेतील प्रतिनिधींच्या भेटींचे नियोजन करण्यात येत आहे असे सांगितले. बैठकीस महसूल, पर्यटन, आरोग्य, सांस्कृतिक कार्य विभाग, परिवहन विभाग आदींचे अधिकारी उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.