MLA Santosh Bangar : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

18 जानेवारी रोजी दुपारी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास संतोष बांगर यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनी प्राचार्यांनी तक्रार दिली. त्यामुळे 10 दिवसांनंतर दाखल झालेला गुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसापूर्वी हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण केली होती, हे प्रकरण बांगर यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी बांगर यांच्यासह 40 जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आज (शनिवारी) गुन्हा दाखल केला. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे.
बांगर यांनी प्राचार्यांचे कान पकडून त्यांना मारहाण केली होती, याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला होता. प्राचार्य डॉ.अशोक उपाध्याय एका प्राध्यापिकेला त्रास देत असल्याची तक्रार बांगर यांच्याकडे आली होती. याचा जाब विचारण्यासाठी बांगर हे डॉ. उपाध्यक्ष यांच्याकडे आले होते. बांगर यांनी केलेल्या या कारनाम्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. प्राचार्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आमदार संतोष बांगर, शंकर बांगर, महाविद्यालयातील अधिव्याख्याता यांच्यासह 40 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आज पहाटे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. "आमदार संतोष बांगर, शंकर बांगर यांच्यासह प्राध्यापक अशा 40 जणांनी प्राचार्यांच्या कक्षेत येऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. सीसीटीव्हीचे, डीव्हीआरचे वायर तोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले, असे डॉ. अशोक उपाध्याय यांनी तक्रारीत म्हटले आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.