Tasgaon News : तासगाव तालुक्यात आबा-काकानंतर आता दोन ज्युनिअर पाटलांची जुंपली

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका आतापर्यंत स्वर्गीय आर. आर. पाटील आबा आणि संजय पाटील यांच्या राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जात होता. आबा आणि संजयकाका पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच तालुक्यातील राजकीय संघर्षाने झाली होती. आबा गृहमंत्री पदावर असतानाही संजय पाटील यांनी नमती भूमिका न घेता विरोध कायम ठेवला होता.
आबा यांच्या निधनानंतर काही वर्षांमध्ये आबांचे कुटुंब आणि संजय पाटील गटात कधी वाद, तर कधी दोघांमध्ये सामंजस्य होऊन वाद टाळले जायचे. मागील काही निवडणुकीत दोन्ही गटाने वाद टाळले. मात्र,आपल्या मुलाला राजकारणात आणणार नाही, असे काही वर्षांपूर्वी खासगीत म्हणणाऱ्या खासदार संजय पाटील यांना मात्र अलीकडेच आपला मुलगा प्रभाकरला राजकारणात लॉन्च केलं आहे. त्यामुळे दोन सिनिअर पाटलांमधील संघर्ष आता ज्युनिअर पाटलांपर्यंत येऊन पोहोचला आहे. प्रभाकर पाटील यांनी सूचक इशारा दिल्यानंतर रोहित आर. आर. पाटील यांनीही आता जाहीर इशारा दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. दोन्हीकडून भावी आमदार म्हणून केला जात असल्याने आव्हानाची भाषा वाढतच जाण्याची चिन्हे आहेत. रोहित पाटलांना आगामी निवडणूकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.