Chief Minister takes note of MP imtiaz jaleel's movement : खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

काही दिवसांपुर्वी विभागीय आयुक्त कार्यालयावर कंत्राटी कामगारांच्या हक्क व मागण्यांसाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालीमोर्चा काढण्यात आला होता. अखेर या मोर्चाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली असून मुख्यमंत्री सचिवालयाने कंत्राटी कामागारांच्या मागण्याबाबत योग्य निर्णय घेवून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक, अत्याचार, विविध योजना व लाभापासून वंचित ठेवणारे कंत्राटदार, शासन निर्णय, परिपत्रक व आदेशाची जाणूनबुजून अमलबजावणी न करणार्या संबंधित अधिकारी यांच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करावी. तसेच कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ६ जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि इतर संबंधित विभागांना कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देखील पाठवण्यात आले होते. याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने योग्य कार्यवाही करुन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कामगार उपायुक्त यांना दिले आहेत. तसेच विभागीय आयुक्त यांनी सुध्दा मनपासह इतर प्रमुख कार्यालयांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या व आस्थापनेत विविध संवर्गात कंत्राटी तत्वावर कार्यरत कामगारांना प्रचलित कामगार कायदा, शासन निर्णय, परिपत्रक व आदेशाची तंतोतंत अमलबजावणी करुन किमान वेतन, पी.एफ़़, ई.सी.एस.आय व इतर योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी करत आंदोलन केले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.