Mumbai Municiple Corporation : मिंधे सरकारचा मुंबई महापालिकेच्या एक लाख कोटी रुपयांच्या एफडीवर नजर

महाविकास आघाडी, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माध्यमातून मुंबईत झालेल्या कामांच्या भूमिपूजन- लोकार्पणाचा घाट पंतप्रधानांच्या हस्ते घातल्यानंतर आता 'मिंधे' सरकार आणि भाजपची पालिकेच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवर वक्रदृष्टी पडली आहे. या ठेवींचा वापर आपत्कालीन स्थिती, कर्मचाऱ्यांची देणी आणि मोठया प्रकल्पांसाठी गरजेनुसार वापरण्याचे नियोजन असताना या ठेवी मोडण्याचा घाट घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामांसाठी पाठपुरावा करण्यात आल्यामुळे ती मार्गी लागली. मात्र या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न 'मिंधे' सरकार आणि भाजपकडून सुरू आहे. यातच आता पालिकेच्या मुदत ठेवी मोडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून याचे संकेत दिले. ते म्हणाले की, बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवल्याने कोणताही फायदा होत नाही, तर हे पैसे खर्च केल्याने जनतेसाठी उपयोग होतो. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील बोलताना याचा उल्लेख केला. त्यामुळे सरकार आणि भाजपचा आता पालिकेच्या मुदत ठेवींवर डोळा असल्याच समोर आले आहे.
...तर पालिका आर्थिक अडचणीत येईल
पालिकेच्या मुदत ठेवींचा वापर अत्यावश्यक मोठया महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी वापरता येऊ शकतो. तसा वापरही केला जात आहे. यामध्ये कोस्टल रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प अशा मोठया प्रकल्पांचा समावेश आहे. शिवाय मुदत ठेवीतील 30 ते 40 टक्क्यांचा निधी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन, पीएफ, ग्रॅच्युईटी देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. या मुदत ठेवी मनमानीपणे खर्च करता येणार नसून तसे केल्यास पालिका आर्थिक अडचणीत येऊ शकते, असेही पालिका अधिकायाकडून सांगण्यात आले.
जकातीची कसर भरून काढण्यात उपयुक्त
पालिकेची सध्याची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. मात्र मुदत ठेवींचा वापर मनमानीपणे केल्यास पालिका आर्थिक संकटात येऊ शकते असे मत अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेली जकात बंद झाल्यानंतर राज्याकडून भरपाई मिळत असली तरी महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. कारण जकातीसारखा थेट महसूल आता मिळत नाहीय. त्यामुळे या मुदत ठेवींचा वापर योग्यरीतीनेच व्हायला हवा, असे मत पालिकेच्या माजी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या काळात 'एफडी' वाढली
पालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेत आल्यानंतर मुदत ठेवींमध्ये वाढ झाली असल्याचे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. शिवसेना गेल्या 25 वर्षापासून पालिकेत सत्तेत आहे. या ठेवी आता एक लाख कोटींवर गेल्याने पालिकेला आर्थिक मजबुती मिळाली असून हे शिवसेनेच्या 'सुशासनाचे उदाहरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 20 वर्षापूर्वी पालिकेची मुदत ठेव केवळ 645 कोटी होती.
पालिकेची सध्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मात्र मुदत ठेवींचा वापर मनमानीपणे केल्यास पालिका आर्थिक संकटात येऊ शकते असे मत अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
'मिंधे' सरकारने राज्याची लूट करताना स्वतःला विकले तसे मुंबईला विकू नये अशा शब्दांत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सुनावले होते. त्याचवेळी मिंधे सरकार आणि भाजपचा मुंबई पालिकेच्या 'एफडी'वर डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता 'बीकेसीच्या सभेत पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पालिकेचा पैसा बँकामध्ये ठेवून फायदा नसल्याचे विधान केल्याने आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.