PM Modi Mumbai Visit : मुंबईत मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी, बनावट NSG जवानासह दोघांना अटक, एकाकडे घातक शस्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. यासंदर्भात सध्या एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईतील बीकेसी एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. मुंबई पोलिसांनी या परिसरातून दोघांना अटक केली आहे. यापैकी एका व्यक्तीकडे घातक शस्त्र आढळल्याने खळबळ उडाली आहे. कटराम चंद्रगाई कावड असं या आरोपीचं नाव असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 39 वर्षीय कटराम हा हॉटेल आणि ट्रान्सपोर्टचा कर्मचारी असून तो भिवंडी येथील रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे. तर, दुसरी व्यक्ती 35 वर्षांची असून मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी ओळख बदलून फिरत होती, त्यामुळे तिचा ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे मोदींच्या दौऱ्यावेळी सुरक्षेत त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे.
मोदींच्या सभास्थळी गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यावेळी त्याला थांबवून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे स्मिथ अँड वॅगन स्प्रिगफिल्ड रिव्हॉल्व्हरसह चार राऊंड सापडले. त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचा परवाना असल्याचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात कलम 37(1), 135 मापोका 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सैन्य दलातील सैनिक असल्याची बतावणी करुन अज्ञात इसम मोदींच्या सभेत
सैन्य दलातील सैनिक असल्याची बतावणी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे पोहोचण्यापूर्वी सुमारे 90 मिनिटांपूर्वी नवी मुंबईतील एका 35 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तर, अशाच आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीनं स्वत:ला लष्कराच्या 'गार्ड्स रेजिमेंट'मधील नाईक असल्याचं सांगून अतिसुरक्षा असलेल्या व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामेश्वर मिश्रा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याला मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी संशय आल्यामुळे थांबवलं होतं. सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी तो इकडे तिकडे फिरत असल्याने गुन्हे शाखेने त्याच्यावर अर्धा तास नजर ठेवली होती, त्यानंतर त्याला थांबवून ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपीने 13 जानेवारी रोजी जारी केलेले एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) चं ओळखपत्र घातल्याचं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा संशय निर्माण झाला. त्यात त्याला 'रेंजर' म्हणून तैनात करण्यात आल्याचं लिहिलं होतं. पण, आयडीच्या रिबिनवर 'दिल्ली पोलीस सुरक्षा (PM)' असं लिहिलं होतं.
कोठडीत रवानगी
पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केल्यानंतर मिश्रा याने दावा केला की, तो एनएसजीच्या पठाणकोट हबमध्ये प्रतिनियुक्तीवर होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास करण्याचा निर्णय घेतला. चौकशीत त्यांचं ओळखपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं. मिश्रावर आयपीसी कलम 171, 465, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हा खटला सादर केला असता न्यायालयाने त्याला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.