Modi to visit Mumbai : मोदींचा मुंबई दौरा

मुंबईतील विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. हा पूर्णपणे राजकीय दौरा आहे, मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आतापासूनच पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी करत आहेत.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मुंबईत एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरे यांच्या घराशेजारी म्हणजेच बीकेसी ग्राउंडवर घेतली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी अनेक विकासकामांचे उद्धाटन करतील. पण मोदी येत आहेत म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमधील अडथळे लवकरच दूर होणार आहेत, याचेही संकेत मिळत आहेत.
लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणादेखील होऊ शकते, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुंबई दौऱ्यात सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्टेशनदरम्यान, नवी मुंबई मेट्रोच्या 5.96 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन केलं जाईल. या प्रसंगी मुंबई मेट्रोच्या 2 ए आणि 7 हा 35 किमी लांबीचा रेल्वेमार्ग सुरु होऊ शकतो.
एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28,000 कोटी रुपयांचे बजेटच्या 7 एसटीपी म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांटचे भूमीपूजनदेखील यावेळी करतील. मुंबईत 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटिकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाचेही भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. गोरेगाव, ओशिवारा आणि भांडुप येथील तीन रुग्णालयांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.