Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; सत्यजित तांबेनी केला काँग्रेसला बाय-बाय

नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शुंभागी पाटील (Shubhangi Patil) यांनी काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झाले असताना निर्णय न झाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
शुभांगी पाटील यांनी भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना मिळणार हे दिसताच, शुभांंगी पाटील यांनी मुंबईत मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असताना मोठी घडामोड समोर आली आहे. सत्यजित तांबे यांनीच काँग्रेसला रामराम केला आहे का?, अशी चर्चा सुरु झाली आहे.
सत्यजित तांबे यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून त्यांनी पक्षाचं नाव आणि लोगो दोन्ही काढून टाकल्याचं दिसून येतंय. त्याचबरोबर सत्यजित तांबे यांच्या प्रोफाइलवर एक वाक्य झळकतंय. ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’ असा मजकूर या संदेशात आहे.
शुभांगी पाटलांना ‘माविआ’चा पाठिंबा?
ठाकरे गटानं शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र शुभागी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन मतप्रवाह आहेत. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.