Pimpri Chinchwad by election : पिंपरी चिंचवड पोट निवडणूक- शरद पवार म्हणताय..

पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त होत आहे, त्यासाठी भाजपकडून मुंबईतील पोटनिवडणुकीचा दाखला दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोटनिवडणुकीबाबत भाष्य केले आहे. भाजपला पोटनिवडणुकीबाबत आताच कसं सुचलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांकडून या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्वच नेते कामाला लागले आहेत. त्यासंदर्भात बोलताना पवार यांनी वरील सवाल केला आहे.
शरद पवार म्हणाले की, पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनवरोध व्हाव्यात, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पत्र लिहिणार आहेत. ते कोणाला पत्र लिहिणार आहेत. या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. कोल्हापूर, पंढरपूर व नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली होती, त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांना आत्ताच कसं सुचलं कळंत नाही.
महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये एकत्र असण्याबाबत स्पष्टता आहे. पुढचे निर्णय कसे घ्यायचे, याबाबत आमचा एकमेकांशी संवाद सुरू आहे, असे सांगून पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल बदलणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग राज्यपाल म्हणून येणार अशी चर्चा आम्हीही ऐकून आहोत. आताचे राज्यपाल यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली, ही चांगली गोष्ट आहे.
बीबीसीने पंतप्रधानांवर डॉक्युमेंट्री बनवली, त्यावर बंदी घातली आहे. एखाद्या फिल्मवर बंदी घालणे लोकशाहीच्या विरोधी आहे. एखाद्याला फिल्म बघायची असेल तर तो त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. अ, ब, क लोकांना ती फिल्म आवडत नसल्यामुळे तिचे प्रदर्शनच रोखायचे, हे काही ठिक नाही. हे सगळे लोकशाहीच्या विरोधात चालले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.