Ravi rana to bachu kadu : 'बच्चू कडू हा सोंगाड्या आहे', बच्चू कडूंच्या टीकेला रवी राणांकडून प्रत्युत्तर

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केलं आहे. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. त्यानंतर अपेक्षेनुसार रवी राणा यांनीही बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आमदार रवी राणा म्हणाले, “ मला असं वाटतं बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे काही आंदोलन करतो ते फक्त तोडीपाणीसाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची एक ओळख आहे. म्हणून मला असं वाटतं की माझ्यावर जे राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करतात मला त्यांना एकच सांगायचं आहे, रवी राणामध्ये धमक आहे रवी राणा किराणा वाटतो, गोरगरिबांच्या आरोग्याची तपासणी करून देतो. मुलांना शिक्षणासाठी, गरिबांच्या मुलांच्या लग्नासाठी मदत करतो. एखाद्याच्या कुटुंबात मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधींसाठी मदत करतो, कारण रवी राणामध्ये धमक आहे. एखादा आदिवासी तरूण देशासाठी सीमेवर लढत असेल, तर त्याच्या कुटुंबाला रवी राणा स्वत:चा पगारही देतो.” एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
दरम्यान , “ गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूने आरोप करताना दहावेळा विचार केला पाहिजे. विधानपरिषद आली की त्यांना दमडी पाहिजे, राज्यसभा निवडणूक आली की दमडी पाहिजे. सरकारला पाठिंबा द्यायचा तर दमडी पाहिजे. गुवाहाटीला जाययचंय तर दमडी पाहिजे. मला असं वाटतं ज्या माणसाचं जीवनच पैसा आहे आणि स्वत:साठी तर अनेकजण जगतात, बच्चू कडूंना मी सांगेन लोकांसाठीही जगवून दाखव. ज्या पद्धतीने तू बोलतोस जरा एकदा खिशात हात टाकून दाखव, एखाद्या गरिबाला मदत करून दाखव. अरे रवी राणा तर किराणा वाटतो, तू एक किलो साखर तर वाटून दाखव. बच्चू कडूची नौटंकी महाराष्ट्रात, अमरावती जिल्ह्यात लोक पाहात आहेत.” असंही रवी राणा यांनी बच्चू काडुला टोला मारला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.