Maharashtra Cabinet Expansion : लाल दिव्याच्या २३ गाड्या कुणाला मिळणार, याच्यावर दिल्लीत झाली खलबतं विस्तार लवकरच.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चाही झालीय. आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर केंद्रीय मंत्रिमंडळातही महाराष्ट्रातूनही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचं निमित्त हे तर सहकार विभागाच्या बैठकीचं होतं. पण याचवेळी महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
सध्या महाराष्ट्रात 20 मंत्री आहेत. आणखी कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे एकूण 23 मंत्रिपदं रिक्त आहेत. त्यामुळं विस्तार अंशत: करायचा की पूर्ण 23 मंत्रिपदं भरायची यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तसंच शिंदे गटातून आणि भाजपमधून कोणाकोणाला संधी द्यायची, यावरही खलबतं झाल्याचं कळतंय. मंत्रिपद वाटपाबरोबरच कोणाला किती महामंडळ द्यायची? यावरुनही चर्चा झाल्याचं समजतंय.
शिंदे गटाचे आमदार तर मंत्रिमंडळ विस्तारावरुन उघडपणे बोलतायत. विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच शिंदे आणि फडणवीस दिल्लीत गेल्याचं आमदार संजय गायकवाड म्हणालेत.
मंत्रिपदासाठी शिंदे गट आणि भाजपकडून कोण कोण स्पर्धेत?
संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे आणि बच्चू कडू शिंदे गटाकडून स्पर्धेत आहेत. तर भाजपमध्येही मोठी स्पर्धा आहे. संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. हे झालं राज्याचं. पण केंद्रीय मंत्रिमंडळाचाही विस्तार लवकरच होणार आहे. ज्यात मोदींच्या कॅबिनेटमधील 11 मंत्र्यांना नारळ मिळू शकते.
या 11 मंत्र्यांऐवजी, तरुण खासदारांना संधी मिळेल असं सूत्रांकडून समजतंय. पुढच्या वर्षीच लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं मोदींकडे सध्या 1 वर्ष आहे. म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा शेवटचा विस्तार असेल. हा विस्तार करताना वर्षभरातल्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका सुद्धा मोदींच्या लक्षात असतील.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.