18th world Marathi conference : १८ वे जागतिक मराठी संमेलन: काय म्हणाले डॉ. प्रमोद चौधरी आणि साखर आयुक्त शेखर गायकवाड

स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योग क्षेत्राचे, स्वतःचे संशोधन विकास केंद्र गरजेचे -डॉ. प्रमोद चौधरी
उद्योगांना जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःचे संशोधन आणि विकास केंद्र असणे आवश्यक आहे आणि हीच भूमिका प्राज इंडस्ट्रीने पहिल्यापासून स्वीकारली आहे त्याचा नक्कीच फायदा झाला असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी येथे व्यक्त केले.
१८ व्या जागतिक मराठी संमेलनातील २ ऱ्या सत्रात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी डॉ. चौधरी यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. डी. वाय . पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी श्री. गायकवाड यांचा सन्मान केला.
प्राज इंडस्ट्रीजची सुरुवातीपासूनची वाटचाल तसेच शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रवास श्री. चौधरी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला. प्राज इंडस्ट्रीजने १९८९ मध्ये संशोधन केंद्र सुरु केले. त्याआधी म्हणजेच १९८४ मध्ये प्राज चा स्वतंत्र उद्योग सुरु केला. आणि जैवइंधनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. १९७३ मध्ये ब्राझीलला गेलो असताना तेथे इथेनॉल उत्पादन प्रकल्प पहिला. नंतर अमेरिकेने हा प्रकल्प सुरु केला. मात्र, भारतामध्ये या विषयाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. सन २००० मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी ५ राज्यात इथेनॉल उत्पादनाला परवानगी दिली. हा विषय जरी केंद्राचा असला तरी महाराष्ट्राने देखील पाठिंबा दिला. इथेनॉलपासून होणारा फायदा आणि त्याची आवश्यकता याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
खेडेगावातील शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. मात्र, नंतर पुण्यामध्ये आलो आणि शालेय शिक्षण पूर्ण केले असे सांगून डॉ. चौधरी म्हणाले, फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण झाल्यावर आय .आय. टी . मध्ये प्रवेश घेतला आणि त्यासाठी परदेशात न जाता भारतात राहूनच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर , काही काळ नोकरी केल्यावर स्वतंत्र उद्योग सुरु करण्याचा निश्चय केला आणि तो प्राज इंडस्ट्रीजच्या रूपाने उभा राहिला आहे. आजच्या काळात मनुष्यबळाची उपलब्धता विपुल प्रमाणावर असली तरीदेखील इंडस्ट्रीज आणि अकॅडमी यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तरच जैव इंधनाच्या विषयाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ शकेल.
उद्योग-व्यवसाय करताना अनेक स्वरूपाची आव्हाने समोर उभी ठाकली, असे सांगून ते म्हणाले, त्यावर यशस्वीपणाने मात करता आली. एखादा उद्योग यशस्वी होण्यासाठी कष्ट, चिकाटी, याबरोबरच निर्णयक्षमता, नेमके धोरण आणि योग्य संधी याचा मागावा घेतला तर यश नक्कीच मिळू शकते. कोरोना नंतर उद्योग क्षेत्र सावरत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी उद्योजकीय मानसिकता ठेवणे गरजेचे आहे.
साखर आयुक्त गायकवाड यांनी मुलाखतीचा समारोप करताना सांगितले की, साखर उद्योगाला प्राज इंडस्ट्रीजने जे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले त्याचा नक्कीच फायदा झाला. त्यामुळे, आता साखर उद्योग बदलतो आहे. या उद्योगातून इथेनॉल, जैवइंधन याचे उत्पादन वाढत असून साखर उत्पादन हे दुय्यम ठरत आहे. इथेनॉलच्या निर्मितीमुळे आयाती तेलासाठी होणारा खर्च कमी होणार आहे. जेणेकरून परकीय चलन वाचणार आहे. एका अर्थाने भविष्यात ऊस हा कल्पवृक्ष होऊ शकणार आहे. सी.एन.जी. प्रमाणेच सी.बी.जी. वर या पुढील काळात वाहने मोठ्या प्रमाणावर चालवता येणार आहेत, असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.