Action within Two hours : दोन तासात अॅक्शन, बिनधास्त करा तक्रार

गेल्या आठवड्यात पोलिस आयुक्तालयात पोलिस उपायुक्त, अपर पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त अशा अतिवरिष्ठ अधिकार्यांची बैठक पार पडली. त्यावेळी आयुक्तांनी पोलिस ठाणे स्तरावरील कामकाजाचा आढावा घेतला. पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारींची दखल घेण्यास टाळाटाळ करून वेळकाढूपणा केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोन तासात तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.
पुणे पोलिस आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी लोकाभिमुख पोलिसिंग राबविणार असल्याची ग्वाही पुणेकरांना दिली होती. त्यानुसार त्यांनी आता आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होऊन, त्यांना समाधान वाटले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीची तक्रार आपल्या संदर्भात नसेल तर त्यांना तसे मार्गदर्शन करून सांगितले पाहिजे. महिला व लहान मुलांच्या संदर्भातील प्रत्येक तक्रारींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत. एखादी तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा नागरिक पोलिस चौकीत जातात, तेव्हा त्यांना या चौकीतून-त्या चौकीत फिरवले जाते. पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागतात. प्रश्नांचा भडीमार तक्रारदारावरच केला जातो. असे चित्र शहरातील अनेकदा दिसून येते.
"तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना ताटकळत थाबविले जात असल्याचे समोर आल्यानंतर, हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेतला असून, दोन तासात तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्यांना दिल्या आहेत. जे अधिकारी तक्रारींबाबत टाळाटाळ करून दिरंगाई करतील त्यांची गंभीर दखल घेतली जाईल."
– रितेश कुमार
पोलिस आयुक्त
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.