Dispute over Religious site : राहुरी तालुक्यात धार्मिक स्थळावरून वाद

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये धार्मिक स्थळावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळला. दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे झाल्यानंतर मोठा जमाव एकमेकासमोर उभा राहील्याने तणाव निर्माण झाला. महसूल व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वेळीच दखल घेत ग्रामस्थांची बैठक घेत समझोता घडवून आणल्यानंतर वाद निवळल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. गुहा येथील एका धार्मिक स्थळावरून दोन्ही गटामध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरूच आहे. शासकीय पातळीवर दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.
"ग्रामस्थांनी सामंजस्याने निर्णय घ्यावेत. एकमेकांचे मन दुखावणारे कृत्य कोणीही करू नये. प्रशासन योग्य कामकाज करीत आहेत. अनूचित प्रकार घडू न देता एकोप्याने धार्मिक कार्यक्रम पार पाडावे." – अनिल पवार, प्रांताधिकारी
एका गटाने धार्मिक स्थळाचा नावाची नोंद केल्यावरून दुसर्या गटाने नाराजी व्यक्त केली. धार्मिक स्थळ ठिकाणी आरती व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाकडील जमाव एकत्र आल्याने तणावात्मक परिस्थिती पाहता प्रांताधिकारी पवार, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी गुहा गावामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून तत्काळ दक्षता घेतली. गावामध्ये दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे पाहता सायंकाळी बैठकीचे नियोजन ठरले. प्रांताधिकारी पवार, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्यासह उपस्थित अधिकार्यांनी ग्रामस्थांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले.
"गावातील तणाव सामंजस्याने मिटला आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कोणीही चिथावणीखोर वक्तव्य केले किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कारवाई होईल."
– संदीप मिटके, उपअधीक्षक
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.