Jaljeevan mission : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडून जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. योजनेची कामे दर्जेदार, पारदर्शीपणे आणि गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
बैठकीला आमदार भीमराव तापकीर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, उप कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, २०२४ पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरी नळाचे पाणी असेल यासाठी नियोजनबद्ध काम करावे. आता जिल्हा दर सूचीच्या (डीएसआर) दरात वाढ झालेली असल्यामुळे त्यानुसार योजनांसाठी निविदा जाहीर केलेल्या असल्यास निविदेच्या रकमेपेक्षा अधिक दराने निविदा नसाव्यात. ज्या गावात सध्या योजना अस्तित्वात असलेल्या योजना निकषानुसार पाणी पुरविण्यासाठी पुरेशा नाहीत तेथे आवश्यक ती तपासणी करून नवीन योजना करण्याऐवजी सध्याच्या अस्तित्वातील योजनांची क्षमतावाढ करण्यावर भर द्यावा.
योजनांचे त्रयस्थ पक्ष अंकेक्षण करताना झालेले काम, सुरू असलेले काम आराखड्यानुसार आणि निकषानुसार सुरू आहे का याची बारकाईने तपासणी करावी. योजनांसाठी शासकीय जागा आवश्यक असल्यास जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुन आढावा घेऊन मार्ग काढावा, आदी सूचनाही श्री. पाटील यांनी केल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद यांनी सादरीकरण करून योजनेच्या प्रगतीची माहिती दिली. बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.