Krantijoti Savitribai Phule : क्रांतीजोती सावित्रीबाई फुले: एक धगधगती ज्योत

भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुलेंची आज १९२ वी जयंती. सावित्रीबाईंना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या ज्योतिबा सोबत झाला.
लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते.
अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि धैर्य खचु न देता संपुर्ण आत्मविश्वासाने संघर्षाला सामोरे गेल्या आणि यश मिळवलेच.
जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. य
१८९७मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंना ज्ञानज्योती, क्रांतिज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य
१) १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हंटले जाते.
२) इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या.
३) इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
४) २८ जानेवारी १८६३ साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंधगृह जोतीरावांनी सुरु केले असले तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती.
५) १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.
६) इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.
७) इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
सावित्रीबाई फुले यांची प्रकाशित पुस्तके
– काव्यफुले (काव्यसंग्रह)
– सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
– सुबोध रत्नाकर
– बावनकशी
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.