Sports bike crash accident : स्पोर्टस् बाईकची धडक: आजोबा-नातुने गमावला जीव

नातवाला शाळेतून आणत असताना रस्त्यात स्पोर्ट्स बाईकची धडक लागली, पण वाटेतच या आजोबा-नातुवर काळानं घाला घातला. आजोबा आपल्या नातवाला बुधवारी संध्याकाळी मोटारसायकलवर घरी घेऊन येत होते. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. धडक देणारी स्पोर्टस बाईक अत्यंत वेगात होती. या घटनेनतर संतप्त नागरिकांनी ही स्पोर्टस बाईक जाळून टाकली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर दिवे येथे दोन मोटारसायकल्सची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोकुळ धोंडीबा झेंडे( वय ६३) आणि पद्मनाभ झेंडे( वय ४) अशी जागेवर मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गोकुळ झेंडे हे बुधवारी संध्याकाळी आपल्या नातवाला त्याची शाळा सुटल्यानंतर घरी घेऊ जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. यामध्ये गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे गंभीररित्या जखमी झाले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ झेंडे हे दुचाकीवरुन आपल्या नातवाला सायंकाळी शाळेतून आपल्या दिवे येथील घरी घेऊन येत होते. रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकी क्रमांक एम एच बारा यु एक्स ६०५५ ने आजोबांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत आजोबा आणि नातवाला गंभीर मार लागल्याने नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबांना रुग्णालयात नेत असताना ते मरण पावले.
धडक दिलेल्या दुचाकीस्वारांकडे स्पोर्टस बाईक असल्याने ते वेगात होते. त्यामुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी आजोबांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या घटनेत हडपसर पोलिसांनी दुचाकीस्वार यशवर्धन मगदूम याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा भडका उडला. त्यांनी यशवर्धन मगदूम याची स्पोर्टस बाईक पेटवून दिली. त्यामुळे त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे झेंडे कुटुंबावर शोककळा पसरली असून अचानक आजोबा आणि नातू गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.पोलिसांनी नागरिकांना शांत करत तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.
या घटनेनंतर दिवे परिसरातही शोककळा पसरली आहे. महामार्गाच्या परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या अपघातामुळे पुणे-पंढरपूर मार्गावरील सातत्याने होणाऱ्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुरंदर आणि हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या दिवेघाटाजवळ दिवे हे गाव आहे. याच मार्गावरुन पंढरपूरची वारी मार्गक्रमण करते. या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव गेला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.