Maharashtra state olympic games 2022 : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-2022 किल्ले रायगडावरुन येणार स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत

हाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-2022 चे येत्या 2 ते 12 जानेवारी 2023 जानेवारीदरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून 4 जानेवारी 2023 रोजी बालेवाडीकडे प्रयाण करणार आहे.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा-2022 च्या आयोजनाबाबत राज्यात क्रीडा वातावरण निर्मिती होण्यासाठी, क्रीडा स्पर्धेची भव्यता नागरिकांना माहिती होण्यासाठी राज्यात विभागनिहाय क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या सर्व क्रीडा ज्योत 3 जानेवारी 2023 पर्यंत शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे आणण्यात येणार आहेत. स्पर्धेची मुख्य क्रीडा ज्योत किल्ले रायगड येथून 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता निघणार असून ताम्हिणी घाट मार्गे सायंकाळी 6 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे मुक्कामी येणार आहे.
ऑलिम्पिक हॉकीपटू अजित लाकरा, राष्ट्रीय पातळीवरील मैदानी स्पर्धा खेळाडू समिक्षा खरे, राष्ट्रीय पदक विजते हॉकीपटू अक्षदा ढेकळे, प्रज्ञा भोसले, राहुल शिंदे, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रद्धा तळेकर सोहम ढोले, राष्ट्रीय पातळीवरील मैदानी स्पर्धा खेळाडू गायत्री चौधरी, आंतरराष्ट्रीय वुशु खेळाडू श्रावणी कटके आणि स्वराज कोकाटे हे खेळाडू किल्ले रायगड ते पुणे दरम्यान क्रीडज्योत धावक असतील.
नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, मुंबई व पुणे या 8 विभागातील मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणाहून क्रीडा ज्योतींचे आगमन दि. 31 डिसेंबर 2022 ते 3 जानेवारी 2023 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे- बालेवाडी पुणे येथे समायोजनासाठी येणार आहेत. किल्ले रायगडवरुन आलेली मुख्य क्रीडा ज्योत 5 जानेवारी 2023 रोजी एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रथम ऐतिहासिक शिल्प येथे येईल. याच ठिकाणी आठ विभागातून आलेल्या आठ क्रीडा ज्योत एकत्रित येऊन या सर्व क्रीडा ज्योतींचे मुख्य क्रीडा ज्योतीत दुपारी 1 वाजता समायोजन करण्यात येणार आहे.
ऑलिम्पियन खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, केंद्र व राज्य शासनाचे क्रीडा पुरस्कारार्थी यांच्या समवेत लक्ष्मी रोड -डेक्कन, फर्ग्यूसन महाविद्यालय मार्गे, शिव छत्रपती क्रीडा संकूल, महाळूंगे, बालेवाडी येथे ही क्रीडा ज्योत पोहोचणार आहे.
विभागीय क्रीडा ज्योत रॅलींचा मार्ग
नागपूर विभागीय रॅलीचा नियोजित मार्ग नागपूर - वर्धा - समृद्धी महामार्गाने शिर्डी - अहमदनगर - येरवडा, अमरावती विभाग रॅली अमरावती - अकोला - शेगांव - खामगांव - शिंदखेड (राजा) - औरंगाबाद - अहमदनगर -येरवडा, औरंगाबाद विभाग रॅली औरंगाबाद- अहमदनगर - येरवडा, लातूर विभाग- लातूर - उस्मानाबाद- येरवडा, कोल्हापूर विभाग- कोल्हापूर - कराड - सातारा - येरवडा, पुणे विभाग रॅली- बारामती ते येरवडा, नाशिक विभागीय रॅलीचा मार्ग नाशिक - संगमनेर-येरवडा आणि मुंबई विभागीय रॅलीचा नियोजित मार्ग गेट वे ऑफ इंडिया - वाशी - लोणावळा - येरवडा असा असणार आहे, अशी माहिती माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.